चारुलता पाटील

शिक्षण : मुंबई विद्यापीठातून मायक्रोबायोलॉजी या विषयात बी.एस.सी. त्यानंतर काही वर्षांनी कलाशाखेतील शिक्षण. मराठी या विषयात एम.ए. पुढे नाट्यशास्त्र पदविका. विद्यापीठात द्वितीय क्रमांक. लेखन, अनुवाद, नाटक यात विशेष रुची.

१९७९ ते ८२ कोल्हापूरच्या दै. ‘पुढारी’ या वर्तमानपत्राच्या रविवार पुरवणीची संपादिका. याच काळात ‘पुढारी’ या दिवाळी अंकाचे चार वर्षे संपादन. १९८२ ते २००२ ‘मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे व कोल्हापूर’ या पुस्तक प्रकाशन संस्थेत साहित्य-संपादिका.

आकाशवाणीवरील जाहिरातींचे कॉपी-रायटिंग. जिंगल्सचे लेखन. कोल्हापूरमधील एका जाहिरात संस्थेत व्हिज्युअलायझर व कॉपी-रायटर म्हणून जाहिरातींचे काम.

याच काळात दै. ‘महाराष्ट्र टाईम्स’, ‘सकाळ’, ‘केसरी’, ‘पुढारी’ यांच्या रविवार पुरवण्यांतून पुस्तके, नाटक, चित्रपट यांवर समीक्षात्मक लेखन, मान्यवरांच्या दीर्घ मुलाखती, सामाजिक विषयांवरील लेख इ.

लहान मुलांच्या ‘किशोर’ या मासिकातून, तसेच वृत्तपत्रांच्या रविवार पुरवण्यांतून मुलांसाठी कथा व कविता.

सहा ते चौदा या वयोगटातील मुलांवर नात्यातून संस्कार घडविण्याच्या उद्देशाने कोल्हापूर येथे ‘खेळघर’ या संस्थेची स्थापना. नाटकाबरोबरच थिएटर या माध्यमाला पूरक ठरणाऱ्या नृत्य, संगीत, चित्रकला, क्ले-वर्क, नाटुकल्यांचे लेखन इत्यादींचे मुलांना तज्ज्ञ शिक्षकांकडून शिक्षण. अनेक नाटुकल्यांचे लेखन. ‘चट्टामट्टा बाळंभट्टा’ या तीन अंकी बालनाट्याचे लेखन व दिग्दर्शन. मोठ्यांनी केलेले त्याचे रंगमंचीय प्रयोग.

प्रकाशित पुस्तके –

कोल्हापूरचे आणखी एक धर्ममंदिर (१९९०) – कोल्हापूरच्या बालकल्याण संकुलातील उपेक्षित मुलांशी साधलेल्या संवादातून ‘सकाळ’ वृत्तपत्राच्या रविवार आवृत्तीसाठी झालेल्या लेखमालेचे संकलन (प्रकाशक : जिल्हा परिविक्षा व अनुरक्षण संघटना, कोल्हापूर) यांसह आणखीही पुस्तके प्रकाशित.

सत्यजित राय यांचं विश्व (१९९६) मूळ लेखक – विद्युत सरकार (मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे), आवा मारू : टायटॅनिक ऑफ जपान (२०१०) – मूळ लेखक : रेई किमुरा (मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे), चंद्रपहाड (२०१४) मूळ लेखक : विभूतीभूषण बंदोपाध्याय (ज्योत्स्ना प्रकाशन, पुणे), वामाचा खजिना आणि इतर कथा (२०१९) मूळ लेखक : विभूतीभूषण बंदोपाध्याय (ज्योत्स्ना प्रकाशन, पुणे) अशा अनेक पुस्तकांचा अनुवाद.