संजय शेलार

जन्म 15 मार्च 1970 सतत नवनवीन चित्रविषयाच्या शोधात असलेल्या संजय शेलार यांची जडणघडण कोल्हापूरच्या वास्तववादी चित्रकलेच्या परंपरेत झाली. कोल्हापूर येथील कलानिकेतन महाविद्यालयातून जीडी आर्टची पदवी संपादन केल्यानंतर त्यांनी स्वतंत्ररित्या काम करण्यास सुरुवात केली. पोर्ट्रेट्स आणि फिगर पेटिंग यांसाठी प्रसिद्ध असलेल्या शेलार यांनी लॅण्डस्केप्स आणि स्टिल लाइफ या विषयांमध्येही बरंच काम केलं आहे. बॉम्बे आर्ट सोसायटी मेडल, २००२ सालचा आर्ट सोसायटी ऑफ इंडिया यांचा पुरस्कार तसंच महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार यांसारख्या अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. इंटरनॅशनल आर्टिस्टसारख्या आंतरराष्ट्रीय तसंच राष्ट्रीय नियतकालिकांमधून त्यांची चित्रं प्रकाशित करण्यात आली आहेत. नेहरू आर्ट गॅलरी, जहांगीर आर्ट गॅलरी, रे आर्ट गॅलरी यांसारख्या आर्ट गॅलर्‍यांमधून त्यांच्या चित्रांची प्रदर्शनं झाली आहेत. आजवर त्यांनी ६० पेक्षा जास्त वर्कशॉप्स घेतली असून चित्रकलेच्या अनेक महाविद्यालयांत आणि इन्स्टिट्यूट्समध्ये प्रात्यक्षिकं दिली आहेत.