प्रा. डॉ. स. गं. मालशे
जन्म : २४ सप्टेंबर १९२१
मृत्यू : ७ जून १९९२
प्रख्यात मराठी साहित्यिक, संपादक, समीक्षक आणि संपादक. कीर्ती महाविद्यालय तसेच ना. दा. ठा. महिला विद्यापीठात मराठी विभाग प्रमुख. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या संशोधन मंडळाचे काही काळ संचालक.
ॠणानुबंधाच्या गाठी हा व्यक्तिचित्रणात्मक लेखांचा संग्रह. संतर्पण हा संतसाहित्यावरील लेखांचा संग्रह, आगळं-वेगळं हा आगळ्या वेगळ्या पुस्तकांवरचा लेखांचा संग्रह. नीरक्षीर, आवडनिवड हे समीक्षात्मक लेखसंग्रह. हे ग्रंथ त्यांची रसज्ञ आणि मर्मग्राही वृत्ती दर्शवणारे आहेत.
सावरकरांच्या अप्रसिद्ध कवितांचे हस्तलिखित, झेंडूची फुले, महात्मा फुले समग्र वाङमय, स्त्री-पुरुष तुलना ही त्यांची संपादने महत्वाची ठरली आहेत.
१९व्या शतकाचा विशेष अभ्यास करून त्यांनी संशोधनात्मक लिखाण केले. गतशतक शोधिताना, विधवा विवाह चळवळ (सहलेखिका नंदा आपटे) तारतम्य ही पुस्तके याची साक्ष पटवतात.
बालसाहित्यात उसघरातील गुरगुऱ्या, काझीचा न्याय, जादूचे स्वप्न, विलक्षण तंटे, चतुराईच्या गोष्टी यासारखी पुस्तके लिहून त्यांनी मोलाची भर टाकली आहे.
साहित्य सिद्धांत (थिअरी ऑफ लिटरेचर, ले. वेलेक व वॉरेन), सुखाचा शोध (स्ट्रेंज इंटरल्युड ले. युजीन ओलीन), श्रीमंत सयाजीराव गायकवाड (ले. चावडा), कलेची मूलतत्वे (प्रिन्सिपल्स ऑफ आर्ट ले. कोलिंगवुड) या ग्रंथांचे अनुवादही त्यांनी केले आहेत.

