शांता शेळके
जन्म १२ ऑक्टोबर १९२२
मृत्यू ६ जून २००२
प्रतिभावंत कवयित्री व लेखिका शांता शेळके यांचा जन्म पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर येथे झाला. संस्कृत आणि मराठी भाषेतून एम. ए. करताना त्या मुंबई विद्यापीठात पहिल्या आल्या. त्यावेळी त्यांना न.चि. केळकर आणि चिपळूणकर पुरस्कार प्राप्त झाले. त्यानंतर त्यांनी पत्रकारिता, कथालेखन, अनुवाद, बालसाहित्य अशा अनेक क्षेत्रांत यशस्वीपणे मुशाफिरी केली. असे विविध प्रकारचे दर्जेदार साहित्य असणारी त्यांची जवळपास १०० पुस्तके प्रकाशित झाली आहेत. याचबरोबर त्यांनी व्यक्तिचित्रात्मक लेखनही केले. धूळपाटी या नावाने त्यांचे आत्मचरित्रात्मक लेखन प्रसिद्ध आहे.
आळंदी येथे भरलेल्या ६९व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले.
शांताबाई कवयित्री म्हणून अधिक प्रसिद्ध आहेत. मोठ्यांच्या कवितांबरोबरच लहान मुलांचे भावविश्व त्यांनी कवितांमधून साध्या-सोप्या शैलीत मांडले आहे. त्या म्हणतात, ‘लहान मुलांसाठी कविता लिहिणे हे एक अवघड पण सुंदर आव्हान आहे. कवितेसंबंधीचे सारे ज्ञान, व्यासंग आणि पूर्वग्रह बाजूला ठेवून, एका निखळ, निर्मळ आणि अविकृत मनाने बालकवितेकडे जायला हवे.’ म्हणूनच
हिरव्या हिरव्या गवतातून
आली लाट, गेली लाट
निळ्या निळ्या पाण्याचा
विसकटून गेला काठ
अशा तरल ओळी त्या लिहितात.




