रवी परांजपे
जन्म : ८ ऑक्टोबर १९३५
मृत्यू : ११ जून २०२२
जादुई वास्तववादी चित्रकार (Magical realist) अशी रवी परांजपे यांची ओळख आहे. दृश्यातून सौंदर्याचा शोध घेण्यासाठी त्यांनी दृश्य वास्तवाला जादुई रूप देऊन त्याकडे स्वतःच्या ‘दृष्टीतून’ पाहिले व कागदावर रेखाटले.
दृश्य वास्तवाला दिलेला भावनिक प्रतिसाद परांजपे यांनी निर्मिलेल्या कलाकृतींमधून दिसतो. त्यामुळे त्यांचे रंग, ते हाताळण्याची पद्धत वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि त्यांची शैली त्यांची, स्वतःची आहे. अनेक वर्षांच्या चित्रसाधनेतून त्यांनी ती विकसित केली आहे. आजवर त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले असून १९९५ साली त्यांना कम्युनिकेशन आर्ट्स गिल्डतर्फे कॅग हॉल ऑफ फेम हा पुरस्कार देण्यात आला. १९९६ साली त्यांना दयावती मोदी फौंडेशन आर्ट कल्चर आणि एज्युकेशनतर्फे दयावती मोदी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. प्रसिद्ध अभिनेता अमिताभ बच्चन, पं. जसराज यांसारख्या मान्यवरांकडे त्यांची चित्रं असून जगभरात त्यांच्या चित्रांचे चाहते आहेत.
