प्रभाकर कुकडोलकर
मूळगाव बेळगाव. सुळगे भल्लूर
१९८० साली फर्ग्युसन महाविद्यालयातून विज्ञानशाखेची पदवी प्रथमश्रेणीत उत्तीर्ण. १९८२ साली महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ‘वनपरिक्षेत्र अधिकारी’ म्हणून निवड. चिखलदरा येथील वन महाविद्यालयातून वनव्यवस्थापन या विषयाचे एक वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण.
१९८४ साली डेहराडून येथील भारतीय वन्यजीव संस्थेतील ‘वन्यजीव व्यवस्थापन’ या विषयावरील अभ्यासक्रमात विशेष प्रावीण्याबद्दल थोर पक्षीतज्ज्ञ डॉ. सालीम अलींच्या हस्ते गौरव.
१९८७ साली फर्ग्युसन महाविद्यालयातील छायाचित्रकलेच्या एक वर्षाच्या अभ्यासक्रमामध्ये प्रथम क्रमांक.
२०११मध्ये वनसेवेतून ‘साहाय्यक वनसंरक्षक’ पदावरून स्वेच्छानिवृत्त. सध्या पर्यावरण संवर्धन, शिक्षण आणि प्रशिक्षण क्षेत्रात सल्लागार म्हणून कार्यरत.
प्रशिक्षण आणि वनसेवेच्या २८ वर्षांच्या कालावधीत अनेक राज्यांतील वने, अभयारण्ये, राष्ट्रीय उद्याने व व्याघ्र प्रकल्पांच्या व्यवस्थापनाचा अभ्यास करण्याची दुर्मीळ संधी. विविध वर्तमानपत्रे, मासिकांतून वने, वन्यजीव, सामाजिक वनीकरण व पर्यावरण संवर्धनाबाबत ३००पेक्षा अधिक लेख प्रसिद्ध. आकाशवाणी पुणे केंद्रावरून अनेक विषयांवरील भाषणांचे प्रसारण. वन्य प्राणीगणना आणि विशेषतः व्याघ्रगणनेचा गाढा अनुभव. मानवी वस्तीत आलेल्या वन्य प्राण्यांना पकडणे व पुन्हा निसर्गात मुक्त करण्याच्या कामाचा विशेष अनुभव आणि आवड.

