कुसुमाग्रज
जन्म २७ फेब्रुवारी १९१२
मृत्यू १० मार्च १९९९
मराठी साहित्यातले ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यिक वि. वा. शिरवाडकर यांनी कुसुमाग्रज या नावाने कविता लिहिल्या. फेब्रुवारी १९१२ मध्ये जन्माला आलेले कुसुमाग्रज नाशिकमध्ये वाढले. त्यांनी सामाजिक चळवळीमध्येही सक्रिय सहभाग घेतला. कल्पनावैभव, चिंतनशीलता आणि सामाजिक जाणीव ही त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये आहेत.
सुरुवातीच्या काळात पत्रकारिता करत असताना त्यांच्या कविता तत्कालीन नियतकालिकांमधून प्रसिद्ध होत होत्या. १९४२ साली प्रसिद्ध झालेला विशाखा हा काव्यसंग्रह चांगलाच गाजला. त्यानंतर त्यांचे समिधा, वादळवेल, हिमरेषा, छंदोमयी, मारवा असे कवितासंग्रह प्रकाशित झाले. तसेच लहान मुलांसाठीही त्यांनी काव्यलेखन केले आहे.
कवितांशिवाय त्यांनी कादंबरी-कथा लेखन, नाट्यलेखन केले आहे. त्यांचे नटसम्राट हे नाटक चांगलेच गाजले. त्याचे आजवर अनेक प्रयोग झाले आहेत. ‘नटसम्राट’ या नाटकासाठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.
१९८८ साली ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार देऊन त्यांच्या वाङ्मयीन कर्तृत्वाचा गौरव करण्यात आला.

