डॉ. म.वि.गोखले

प्रा.डॉ.म.वि.गोखले यांना अध्यापनाचा प्रदीर्ध अनुभव असून ते पुणे येथील नौरोसजी वाडिया महाविद्यालय येथून मराठी विभागाचे प्रमुख म्हणून निवृत्त झाले. त्यानंतर त्यांनी पुणे विद्यापीठाच्या पदव्युत्तर मराठी विभागातही अध्यापनाचं काम केलं आहे. १९८८मध्ये त्यांना अमेरिकेतल्या इंडियाना युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्व्हानिया येथून अतिथी प्राध्यापक म्हणून पाचारण करण्यात आलं होतं.

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यकारिणीवर त्यांनी विविध पदांची जबाबदारी पार पाडली असून महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या वाङ्ममयकोश प्रकल्पात त्यांनी विभागीय संपादक म्हणून काम पाहिलं आहे. आजवर त्यांची ९२ पेक्षा जास्त पुस्तकं प्रकाशित झालेली असून त्यासाठी त्यांना अनेक खासगी व शासकीय पुरस्कार मिळाले आहेत. यशोदेला न्याय हवा, महाभागवत, सत्यप्रतिज्ञा, भीष्म यांसारख्या कादंबर्‍या, छत्रपती शिवराय, लंकाधीश रावण यांसारखी चरित्रं, अनेक संपादित ग्रंथ, प्रबंध असं विपुल लेखन त्यांनी केलं आहे.