चंद्रकांत मांडरे
जन्म : १३ ऑगस्ट १९१३
मृत्यू : २७ फेब्रुवारी २००१
चंद्रकांत मांडरे म्हणजे कोल्हापूर आणि पर्यायाने महाराष्ट्राच्या जलरंग परंपरेतील ज्येष्ठ चित्रकार. त्यांनी जलरंग चित्रणात भरीव कामगिरी केली आहे. त्यासाठी त्यांनी भारताबरोबरच युरोप व अमेरिकेतही भटकंती केली आहे. त्यांची अनेक प्रदर्शनेही झाली आहेत.
बाबुराव पेंटर यांच्यामुळेच कोल्हापुरात चित्रपट निर्मितीस सुरुवात झाली. त्यांच्याबरोबर कलादिग्दर्शक म्हणून काम करणारे बाबा गजबर यांच्याकडे मांडरे यांनी चित्रकलेचे शिक्षण घेतले. निसर्गचित्रे हा मांडरे यांचा आवडता विषय. याशिवाय त्यांनी तैलरंग आणि पेन्सील, पावडर शेडिंग या माध्यमातही काम केले आहे.
पुढे ते अभिनयाकडे वळले. त्यांनी पंचेचाळीसहून अधिक वर्षे चित्रपटक्षेत्रावर आपला ठसा उमटवला. चित्रपटांमुळे त्यांना पैसा, कीर्ती उदंड लाभली. परंतु त्यांच्यातील चित्रकार तितक्याच आत्मीयतेने कार्यशील राहिला होता.

