टारफुला (संक्षिप्त आवृत्ती)

टारफुला (संक्षिप्त आवृत्ती)

  • ISBN: 978-81-7925-579-7
  • आवृत्ती: पहिली आवृत्ती
  • पाने: 112
  • आकार: 5.5'' x 8.5''
  • कव्हर: पेपरबॅक
  • INR 100

About the book

संक्षिप्तीकरण : डॉ. कीर्ती मुळीक

ईबुकसाठी इथे क्लिक करा.

तीन पिढ्यांची कहाणी ‘टारफुला’ या कादंबरीत येते. कोल्हापुरात दऱ्याखोऱ्या आणि डोंगरांच्या घळींनी वेढलेलं एक गाव. या गावचा पाटील हृदक्रिया बंद पडून अकस्मात मरण पावतो. त्याला मूलबाळ नसल्यामुळे पाटलीणबाईंनी आपल्याच मुलाला दत्तक घ्यावे, असे गावातील मातब्बर व्यक्तींना वाटू लागते. पाटलीणबाई भावाच्या लहान मुलाला दत्तक घेण्याचा निर्ण आबा कुलकर्णींना सांगून गाव सोडून भावाकडे राहण्यास जातात. गावावर आता कुणाचाच वचक न राहिल्याने दऱ्याखोऱ्यातील फरारी दरोडेखोर मातब्बर व्यक्तींच्या सांगण्यावरून गावात येऊ लागतात आणि दहशत माजवू लागतात. आबा कुलकर्णींवर पाटलीणबाईंना आपलं मूल दत्तक घेण्याविषयी सांगण्यासाठी दबाव आणू लागतात. पाटलांच्या गरीब कुळांना हटवून त्यांची शेती या व्यक्ती आपल्या ताब्यात घेतात आणि कुलकर्णी ऐकत नाही असे वाटून त्यांचा खून केला जातो.

पाटलीणबाईंच्या सांगण्यावरून सरकार गावावर नव्या पाटलाची नेमणूक करते. हे नवे पाटील सैन्यातून निवृत्त झालेले आणि भारदस्त व्यक्तिमत्त्वाचे असतात. आपल्या तीनचार तरूण आणि तगड्या भावांना आणि गावातील प्रतिष्ठित राऊनाना यांना बरोबर घेऊन ते गावातील बंडखोरांना वठणीवर आणतात. पण हळूहळू त्यांचा अहंकार वाढू लागतो आणि ते गावावर स्वतःचा एकतंत्री आणि अनियंत्रित कारभार सुरू करतात. गावाला आपल्याशिवा कुणी वाली नाही हे लक्षात येऊन ते गावकऱ्यांवर अन्याय करू लागतात.

गावातील तरूण मुले पाटलांचा अन्यायी कारभार सहन न होऊन पाटलांविरूद्ध आवाज उठवतात. वृद्ध पाटील आणि तरूण पिढी यांच्यात संघर्ष सुरू होतो. पाटलांची तरूण वयातील उमेद आता कमी झालेली असते. त्यामुळे तरूण पिढीचा ते काटा काढू पाहतात, पण त्यांना येत नाही. या पिढीचा प्रभाव वाढू लागतो आणि पाटलांना असाहाय्यपणे ते पहावे लागते.

टारफुला ही वनस्पती ज्याप्रमाणे पाऊसपाणी, खतपाणी न मिळताही जोमाने वाढत राहते; जमिनीवर घट्ट मुळे रोवून वेगाने सर्वत्र पसरू लागते, त्याप्रमाणे हा सत्तेचा संघर्षही सर्वत्र जोरकस आढळून येतो; हे लेखकाला कादंबरीच्या शीर्षकातून सुचवाचे आहे.