लीलाधर हेगडे

लीलाधर हेगडे

शाहीर लीलाधर हेगडे यांचा जन्म ९ नोव्हेंबर १९२७ रोजी ठाणे शहरात झाला. विद्यार्थिदशेत असतानाच त्यांनी १९४२च्या चळवळीत भाग घेतला. स्वातंत्र्य चळवळीत ते गीते व पोवाडे गात असत. आवाजाची देणगी त्यांना उपजतच लाभली होती. त्यामुळेच पुढे ते शाहीर म्हणून ओळखले जाऊ लागले. पंढरपूरचे विठ्ठल मंदिर दलितांना खुले व्हावे म्हणून साने गुरुजींनी समाजात जागृती करण्यासाठी १९४७ मध्ये पश्चिम महाराष्ट्राचा दौरा केला. त्यात हेगडे शाहीर म्हणून सामील झाले होते. 

शिक्षण आटोपल्यावर ते राष्ट्र सेवा दल या समाजवादी स्वयंसेवक संघटनेचे पूर्ण वेळ सेवक झाले. त्यांनी १९४८ ते १९८० या काळात राष्ट्र सेवा दल कलापथकाची धुरा वाहिली. 

शाहीर लीलाधर हेगडे यांनी ४० वर्षे सांताक्रूझमधील चुनाभट्टी झोपडपट्टीत ‘साने गुरुजी आरोग्य मंदिर’ या संस्थेचे मानद कार्यवाह म्हणून काम केले. एक आदर्श बहुउद्देशीय शैक्षणिक संस्था म्हणून त्यांनी ही संस्था नावारूपाला आणली. सध्या ते या संस्थेचे अध्यक्ष आहेत.

शाहीर हेगडे यांना महाराष्ट्र फौंडेशन, न्यूयॉर्क आणि केशव गोरे स्मारक, गोरेगाव, मुंबई यांच्यातर्फे आदर्श कार्यकर्ता म्हणून रु. ५०.००० चा पुरस्कार मिळाला. तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने फेब्रुवारी २०११ मध्ये रु. ५०,००० गौरववृत्ती प्रदान करून त्यांचा सन्मान केला.

त्यांच्या ‘गुंतागुंत’, ‘पाचूचे बेट’, ‘मनी हरवली मनी सापडली’, ‘हणमू’, ‘वेरुळचे वैभव’ इत्यादी पुस्तकांना शासकीय पुरस्कार मिळाले आहेत.

मुलांसाठी त्यांनी विपुल लेखन केले आहे. बालवाङ्मयातील त्यांच्या या कार्याची दाखल घेऊन २०१५ साली साहित्य अकादमीने त्यांना 'बाल साहित्य पुरस्कार' जाहीर केला आहे.