
माधुरी पुरंदरे
माधुरी पुरंदरे यांनी मुंबईतील जे.जे. स्कूल ऑफ आर्टमधून जीडी आर्टचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर पॅरिस येथे जाऊन चित्रकला व ग्राफिक आर्ट यांचे शिक्षण घेतले. पुणे विद्यापीठातून त्यांनी फ्रेंच भाषेचा डिप्लोमाही केला. पुढे अनेक वर्षे त्यांनी अलीओंस फ्रांसेज संस्थेमध्ये फ्रेंच भाषा शिकवण्याचे कार्य केले.
चित्रकला आणि साहित्य या दोनही क्षेत्रांत उत्तम गती असणार्या माधुरी पुरंदरे यांनी बाल व कुमारांसाठी विपुल लेखन केले आहे. ‘आमची शाळा’, ‘राधाचं घर’, ‘यश संच’, ‘सख्खे शेजारी’, ‘पाचवी गल्ली’, अशा पुस्तकांतून त्यांनी मुलांच्या भावविश्वाचा आणि त्यांच्या आसपासच्या परिसराचा घेतलेला शोध मुलांप्रमाणेच मोठ्यांनाही भावणारा ठरला आहे.
‘वाचू आनंदे’ या पुस्तक-संचातून चांगल्या मराठी साहित्यातील निवडक वेच्यांची आणि त्या आधारे देशभरातील नामवंत चित्रकारांच्या चित्रांची आणि विविध चित्रशैलींची त्यांनी ओळख करून दिली.
मुलांना भाषाभ्यासाची गोडी लागावी, त्यांची व्याकरणाची जाण वाढावी या हेतूने लिहिलेला ‘लिहावे नेटके’ हा पुस्तक-संच मुलांसाठीच नव्हे, तर मोठ्यांसाठीही भाषेचा अभूतपूर्व मार्गदर्शक ठरला.
मुलांप्रमाणेच प्रौढांसाठीही त्यांनी उत्तम साहित्यनिर्मिती केली आहे. त्यांनी मराठीत लिहिलेल्या पिकासोच्या चरित्राला कोठावळे पुरस्कार मिळाला. त्यांना फ्रेंच भाषाही चांगली अवगत आहे. मराठीतील कोसला, वाडा चिरेबंदी, बलुतं अशा दर्जेदार पुस्तकांचा त्यांनी फ्रेंचमध्ये अनुवाद केला आहे तर वेटिंग फॉर गोदो, लस्ट फॉर लाइफ, हॅनाज सूटकेस अशी जगप्रसिद्ध पुस्तके मराठीत आणली आहेत.
संगीत व अभिनय या क्षेत्रांतही त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे.
बालसाहित्यातील त्यांच्या एकंदर योगदानाबद्दल २०१४ साली साहित्य अकादमीने त्यांना सन्मानित केले आहे.
'पराग' या टाटा ट्रस्टच्या उपक्रमाने नव्यानेच सुरू केलेला 'बिग लिटील बुक अवॉर्ड' हा पुरस्कार पहिल्याच वर्षी माधुरी पुरंदरे यांना मिळाला आहे. या अवॉर्डसंबंधी अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.
या पुरस्काराच्या निमित्ताने 'पराग'ने घेतलेली त्यांची मुलाखत वाचण्यासाठी इथे क्लिक करा.
माधुरी पुरंदरेंविषयी छापून आलेले लेख -
संध्या टांकसाळे यांचा महाराष्ट्र टाइम्समधील लेख - मुलांच्या चष्म्यातून मुलांचं लेखन
वर्षा सहस्रबुद्धे यांचा लोकसत्तामधील लेख - त्या लिहितात, मुलं 'ऐकतात'!